- राज्य
- 'बोगस मतांवर धनंजय मुंडे यांनी मिळवला विजय'
'बोगस मतांवर धनंजय मुंडे यांनी मिळवला विजय'
माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख शरद पवार यांच्या पक्षात दाखल
परळी: प्रतिनिधी
माजी मंत्री धनंजय मुंडे हे निव्वळ बोगस मतांवर विधानसभा निवडणूक जिंकले आहेत. पुढच्या निवडणुकीत त्यांना एवढी मते मिळणार नाहीत, असा दावा परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी केला आहे. देशमुख यांनी धनंजय मुंडे यांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.
परळी विधानसभा मतदारसंघात येथील आमदारांनी कोणतीही विकास कामे केली नाहीत. हजारो कोटींच्या कामाच्या निविदा काढण्यात आल्या. मात्र, त्यासंबंधीच्या सर्व फाइल्स नगरपरिषद कार्यालयातून गायब झाल्या आहेत. मतदार संघातील अपूर्ण विकास कामांबद्दल आपण वारंवार धनंजय मुंडे यांच्याकडे पाठपुरावा केला. मात्र, मुंडे यांनी मतदारसंघात केवळ मनमानी कारभार केला, असा आरोप देशमुख यांनी केला.
मुंडे यांच्या मनमानी कारभाराची आणि परळ विधानसभा मतदारसंघाच्या मागासलेपणाची जाणीव उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वारंवार करून दिली. मात्र, त्यांनी याची कोणतीही दखल घेतली नाही. त्या दोघांमध्ये मिली भगत असल्याचे आपल्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आपण अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश करत आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.
मतदारसंघात सहा महिन्यापूर्वीपासूनच आपण कामाला सुरुवात केली आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी खुल्या गटातील महिला आरक्षण आल्यामुळे आपल्या पत्नी संध्या देशमुख ही निवडणूक लढवत आहेत. शहराचा विकास करणे हेच आपले एकमेव ध्येय आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.

