- राज्य
- अजित पवार गटाला मित्रपक्षाकडून मोठा धक्का
अजित पवार गटाला मित्रपक्षाकडून मोठा धक्का
खुद्द विधानसभा अध्यक्षच हाती घेणार कमळ
मुंबई: प्रतिनिधी
पक्षाकडून आपली अवहेलना होत असल्याचा आरोप करून विधानसभा अध्यक्ष योगेश क्षीरसागर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. कार्यकर्त्यांकडून मत जाणून घेऊन पुढची राजकीय वाटचालीची दिशा ठरवू, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले.
पक्षाकडून आपल्या कामाची दखल घेतली जात नाही. अनेक वर्ष बीड नगर पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचे काम मी केले असून देखील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर आलेल्या असताना पक्षाकडून आपल्याला कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नाही, असे आरोप योगेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.
विधानसभा निवडणुकीसाठी मी दोन वर्ष तयारी करत होतो. मात्र, उमेदवारी जाहीर करण्यात पक्षाकडून विलंब करण्यात आला. त्यामुळे या निवडणुकीत आपला पराभव झाला. मी पराभूत झाल्यानंतर पक्षातीलच अनेक जण माझ्या विरोधात राजकीय खेळी करत राहिले. याबाबत पक्ष नेतृत्वाला अनेकदा कल्पना देऊनही त्यांच्याकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आपण विधानसभा अध्यक्ष पदाचा आणि पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. पुढील राजकीय दिशा लवकरच स्पष्ट करू, असे क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

