- राज्य
- 'ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा निर्णय...'
'ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा निर्णय...'
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे स्पष्टीकरण
मुंबई: प्रतिनिधी
अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांची ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी योग्यच आहे. मात्र, त्यासाठी केंद्राचे आणि राज्याचे काही विशिष्ट निकष आहेत. त्याचा विचार करून ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील, असे स्पष्टीकरण कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार अनेक मंत्री अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या परिसराला भेट देऊन आढावा घेण्यासाठी रवाना झाले आहे. भरणे हे देखील जालना आणि अहिल्यानगरमधील बाधितक क्षेत्रांना भेट देणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी योग्य आहे. शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. कधी कोरडा दुष्काळ, कधी अतिवृष्टी, गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल. मात्र, सध्याच्या काळात आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याला सरकारचे प्राधान्य आहे, असे भरणे यांनी सांगितले.
यावर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात राज्यातील काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. गुरे ढोरे वाहून गेली आहेत. अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान मराठवाड्यात, त्यातही नांदेड आणि जालना जिल्ह्यात झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत देता यावी यासाठी महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी युद्ध पातळीवर पंचनामे करण्याच्या कामात गुंतले आहेत, असे भरणे यांनी नमूद केले.