- राज्य
- किरण सोशल फाउंडेशनतर्फे शोध वृद्धाश्रम येथील वृद्धांसाठी मदत
किरण सोशल फाउंडेशनतर्फे शोध वृद्धाश्रम येथील वृद्धांसाठी मदत
श्याम कुलकर्णी’ यांनी दिलेल्या देणगीतून फ्रीज, .नंदुताई सरवदे यांनी दिलेल्या देणगीतून स्वेटरचे वाटप
पुणे: प्रतिनिधी
लातूर वरून आलेल्या, अनेक यातना व अडचणींचा सामना केलेल्या सिंधूताईंच्या आश्रमात आश्रयाला राहून, त्यांना गुरू मानून त्यांच्याकडून समाजसेवेचा वसा घेतलेल्या ज्योतीताई पटाईत यांनी या वृद्धाश्रमाची सुरुवात केली. मुलाबाळांनी घराबाहेर काढलेल्या , हरवलेल्या ,भीक मागत असलेल्या, अनाथ, निराधार अशा वृद्ध महिलांना आधार देण्याच्या हेतूने ज्योतीताईंनी या वृद्धाश्रमाची स्थापना केली.आज घडीला अशा १८ निराधार महिला या वृद्धाश्रमात आहेत. अत्यंत तोकडी सरकारी मदत असताना स्वखर्चाने व समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने ज्योतीताई या सर्व महिलांचा आपुलकीने व काळजीपूर्वक सांभाळ करतात.अत्यंत स्वच्छतेत,नीटनेटके पणाने त्यांच्या राहण्याची ,खाण्याची, सर्व नित्यक्रमांची , औषधे इतकेच नव्हे तर डोळ्यांच्या तसेच गरजेच्या शस्त्रक्रियेंची सर्व जबाबदारी या ज्योतीताई उचलतात.
आज आपण AI च्या युगात प्रवेश केला असताना, आयुष्यभर ज्यांच्यासाठी कष्ट सोसले, ज्यांची तळहाताच्या फोडसारखी काळजी घेतली, अशा स्वतःच्याच मुलाबाळांनी,आयुष्याच्या उत्तरार्धात जेंव्हा आधाराची गरज आहे तेंव्हाच स्वतःच्या स्वार्थासाठी निराधार केलेल्या मातांना पाहून अत्यंत लाज वाटून मान शरमेने खाली जाते.असे वाटते की प्रेम, माणुसकी कुठेतरी हरवत चालली आहे. पण त्याच वेळेला ज्योतीताईंसारख्या व्यक्तींचे कार्य बघून नक्कीच आशेचा एक किरण निर्माण होतो. स्वतःची आर्थिक परिस्थिती नसतानाही अनेक निराधार आयांची आई होऊन त्यांची मायेने काळजी घेणाऱ्या ज्योतीताईंच्या कार्याला मनापासून सलाम.
ज्योतीताई यांच्या शोध वृद्धाश्रमाला अजून अनेक गोष्टींची गरज आहे. तरी ,आम्ही किरण सोशल फाउंडेशनतर्फे समाजातील सर्व दानशूर व्यक्तींना आव्हान करतो की, आपण येथे भेट देऊन एकदा ज्योतीताईंच्या कार्याची माहिती घेऊन त्यांना जमेल तशी मदत अवश्य करावी.