- राज्य
- 'चित्रपटाचा आनंद लुटण्यासाठी दृष्टी विकसित करणे गरजेचे'
'चित्रपटाचा आनंद लुटण्यासाठी दृष्टी विकसित करणे गरजेचे'
चित्रपट समीक्षक सुहास किर्लोस्कर यांचे प्रतिपादन
पुणे,प्रतिनिधी
कोणत्याही चित्रपटाचा आनंद खऱ्या अर्थाने लुटता यावा यासाठी चित्रपट पाहण्याची विशिष्ट दृष्टी प्रेक्षकांनी विकसित करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन चित्रपट समीक्षक, विश्लेषक, लेखक आणि संगीताचे अभ्यासक सुहास किर्लोस्कर यांनी केले.
महात्मा गांधी सप्ताह 2025 अंतर्गत महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने किर्लोस्कर यांचे, चित्रपट कसा पहावा, या विषयावरील दृकश्राव्य सादरीकरण आयोजित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, सचिव अन्वर राजन, साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख आणि समिती सदस्य प्रा. डॉ. एम एस जाधव, स्वप्नील तोंडे आदी मान्यवर व चित्रपट रसिक उपस्थित होते.
आपल्या सादरीकरणा दरम्यान किर्लोस्कर यांनी तद्दन व्यावसायिक चित्रपट वगळता चित्रपटांचे चरित्रपट, युद्धपट, ऐतिहासिक घटना अथवा व्यक्तींवर आधारित काल्पनिक चित्रपट, अल्टरनेट हिस्ट्री अशा चित्रपटांच्या विविध प्रकारांची ओळख करून दिली. त्याचप्रमाणे चित्रपटाचा आस्वाद घेताना पडद्यावर दिसणाऱ्या चित्रांचा अर्थ समजावून घेणे, चित्रपटाची संहिता, अभिनय, दिग्दर्शन, प्रकाश योजना, ध्वनी, संकलन अशा विविध घटकांचा प्रेक्षकांवर पडणारा प्रभाव उदाहरणांसह स्पष्ट केला.
चित्रपटाच्या पहिल्या दोन मिनिटातच दिग्दर्शक चित्रपटाच्या आशय विषयी काही महत्त्वाचे विधान करून जात असतो. त्यामुळे चित्रपटाचा परिपूर्ण आस्वाद घेण्यासाठी चित्रपट अगदी पहिल्या दृश्यापासून बारकाईने पहावा. चित्रपटातील महत्त्वाची दृश्य कॅमेऱ्याने कोणत्या मितीतून आणि कोणातून चित्रित केले आहे, त्यातून दिग्दर्शकाला नेमके काय व्यक्त करायचे आहे हे समजून घ्यावे, असे सांगतानाच किर्लोस्कर यांनी संगीताचा चित्रपटावरील प्रभाव उलगडून दाखवला. त्यासाठी त्यांनी चित्रपटात एकही गाणे नसताना रिचर्ड ॲटनबेरो यांच्या गांधी या चित्रपटाचे उदाहरण दिले. लोकप्रिय चित्रपट आणि दर्जेदार चित्रपट यात नेहमीच फरक असतो, हे देखील त्यांनी निदर्शनास आणून दिले. आपले मुद्दे स्पष्ट करण्यासाठी शिंडलर्स लिस्ट, गांधी, हिडन फीगर्स, डंकर्क, फ्लॅग ऑफ फादर्स, लेटर्स फ्रॉम आयतोजिमा, इमिटेशन गेम, इन्व्हिक्ट्स, लिंकन, आयर्न लेडी अशा चित्रपटातील दृश्य सादर करून त्याचे विश्लेषण केले.
अनेक चित्रपटात नायकाची प्रतिमा मोठी करण्यासाठी इतरांना खुजे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. इतिहासातील सत्य स्वीकारण्याची खुली दृष्टी स्वीकारण्याची तयारी रसिकांनी स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे. प्रामुख्याने भारतीय प्रेक्षकांमध्ये असलेली आपला नायक सर्वगुणसंपन्न असणे आणि त्याला चित्रपटातून तसेच सादर करणे, आवश्यक मानणारी वृत्ती दूर करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
प्रा. डॉ. एस.जाधव यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
जुन्या आणि नवीन हिंदी चित्रपट मधील बहारदार गाणी असलेला " सूरमयी शाम " हा स्वरांजली वाद्यवृंद ऑर्केस्ट्रा देखील सप्ताह दरम्यान सादर करण्यात आला.