- राज्य
- 'प्रसिद्धीसाठी हे स्वतःच फोडून घेतात स्वतःच्या गाड्या'
'प्रसिद्धीसाठी हे स्वतःच फोडून घेतात स्वतःच्या गाड्या'
मनोज जरांगे पाटील यांचा प्रा लक्ष्मण हाके यांच्यावर आरोप
छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी
ओबीसी नेते प्रा लक्ष्मण हाके प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वतःच स्वतःच्या गाड्या फोडून घेतात, असा आरोप करून मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी, आम्हाला यांच्या स्टंटबाजीकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असा टोलाही लगावला.
आज दुपारी प्रा हाके ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेसाठी पाथर्डी येथे निघाले असता आरणगाव बाह्यवळण रस्त्यावर हातात काठ्या घेतलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीच्या मागच्या काचा फोडल्या. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
यापूर्वी देखील ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या गाडीची जाळपोळ, प्रा हाके यांच्या जवळच्या कार्यकर्त्याला मारहाण असे प्रकार घडले आहेत. नवनाथ वाघमारे यांनी या सर्व प्रकारांना जरांगे यांची फूस असल्याचा आरोप केला आहे. या आरोपाचा जरांगे यांनी समाचार घेतला.
सध्या अतिवृष्टी आणि पूर्व परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या संकटात आहे. त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे. आमचे सर्व मराठा कार्यकर्ते त्यात गुंतलेले आहेत. यांच्यावर हल्ले बिल्ले करायला आम्हाला वेळ नाही, असे तरंगे पाटील यांनी सुनावले.
मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी हे ओबीसी समाजाचे सभा, मेळावे होत आहेत. या ठिकाणी कोणकोणते नेते जात आहेत यावर आमचे लक्ष आहे. या सभा मेळाव्यांना जायचे असेल तर मते मागायला आमच्याकडे येऊ नका. या ठिकाणी जाणाऱ्यांना, मग ते कोणत्याही पक्षाचे असो, आम्ही ठरवून पाडू, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.