प्रतिकूलतेवर मात करू भारत संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्णतेच्या वाटेवर 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांचे प्रतिपादन

प्रतिकूलतेवर मात करू भारत संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्णतेच्या वाटेवर 

पुणे: प्रतिनिधी 

संरक्षण क्षेत्रात दीर्घकाळ आयातीवर अवलंबून राहिलेल्या भारताने मागील काही काळात कात टाकली असून प्रतिकूलतेवर मात करून संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्णतेकडे झेप घेतली आहे, असे प्रतिपादन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केले. 

सिम्बॉयसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा पद विधान सोहळा आणि स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे उद्घाटन देखील राजनाथ सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां ब मुजुमदार, स्वाती मुजुमदार व अन्य मान्यवर उपस्थित होते. 

स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ संरक्षण साहित्यासाठी भारत इतर देशांवर अवलंबून होता. याबाबतीत एक देश म्हणून आपण कम्फर्ट झोनमध्ये अडकून होतो. आयातीवर समाधान मानत होतो. मात्र, मागील काही काळापासून भारताने संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू केली आहे. भारत मोठ्या प्रमाणावर शस्त्रांची आणि संरक्षण साहित्याची निर्मिती करत आहे. भारतीय संरक्षण क्षेत्राची उलाढाल 46 हजार कोटींवरून एक लाख 50 हजार कोटीवर पोहोचली आहे. भारत तब्बल पन्नास हजार कोटीची शस्त्र आणि संरक्षण साहित्य निर्यात करीत आहे. या वाटचालीत खाजगी क्षेत्राचे योगदान मोठे आहे, असे राजनाथ सिंग यांनी नमूद केले. 

हे पण वाचा  'संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच इथपर्यंत पोहोचलो'

नुकत्याच पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने नेत्रदीपक कामगिरी केली. या मोहिमेत लष्करांकडून वापरण्यात आलेली शस्त्र आणि संरक्षण साहित्य यामध्ये सर्वाधिक स्वदेशी शस्त्रांचा वापर करण्यात आला. या मोहिमेमध्ये भारतात बनवल्या गेलेल्या संरक्षण साहित्याची गुणवत्ता आणि दर्जा जगाच्या निदर्शनास आला आहे, असा दावा राजनाथ सिंग यांनी केला. 

शेजारी देशातून आलेल्या दहशतवाद्यांनी भारतीय नागरिकांना त्यांचा धर्म विचारून त्यांना ठार मारले तर भारतीय सैन्याने दहशतवाद्यांची कर्म लक्षात घेऊन त्यांना यमसदनाला पाठवले, असेही त्यांनी नमूद केले. 

सध्याच्या काळात तंत्रज्ञानात वेगाने बदल घडत असताना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाची मोठी चर्चा होते. हे तंत्रज्ञान लाखोंच्या नोकऱ्या खाणार, बेरोजगारी आणणार अशी भीती व्यक्त केली जाते. मात्र, तंत्रज्ञान हे कधीही मानवाची जागा घेऊ शकत नाही. संवेदनशीलता, विवेक आणि निर्णय क्षमता या देणग्या परमेश्वराने केवळ माणसाला दिल्या आहेत. तंत्रज्ञान आत्मसात करा. त्याचा प्रभावीपणे वापर करा.  तंत्रज्ञान आणि कौशल्य याशिवाय प्रगती होऊ शकणार नाही, असेही राजनाथ सिंह म्हणाले. 

प्रगती करण्यासाठी केवळ ज्ञान उपयोगाचे नाही तर दैनंदिन जीवनात त्या ज्ञानाचा वापर करण्याचे कौशल्य अंगी असणे गरजेचे आहे. औद्योगिक क्रांतीपासून आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्रांतीपर्यंतचा इतिहास हा कौशल्याचा इतिहास आहे. प्रत्येक युग हे कौशल्यामुळे घडलेल्या बदलांच्या नावाने ओळखले जाते, असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. 

केंद्र सरकारने कौशल्याचे महत्त्व लक्षात घेऊन कौशल्य विकासासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करून अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. देशभरातील तब्बल एक कोटी 63 लाख युवकांना विविध प्रकारच्या कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पारंपारिक कलागुण जोपासणाऱ्या कारागिरांना प्रोत्साहन देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. कौशल्य हे देश उभारणीचे महत्त्वाचे साधन आहे. आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा वापर केवळ स्वतःसाठी नव्हे तर समाजाच्या आणि देशाच्या भल्यासाठी होणे आवश्यक आहे, हे देखील राजनाथ सिंह यांनी निदर्शनास आणून दिले. 

सोशल मीडियाची आभासी दुनिया ही दिखाऊ असून त्यामध्ये गुरफटत न जाता युवकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य कारणासाठी वापर करणे आवश्यक असल्याचे मत राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांच्या जीवनात डोकावणे आणि आपली तुलना त्यांच्याशी करणे ही अत्यंत अयोग्य बाब आहे. इतरांची स्वप्न आपली म्हणून त्याचा पाठलाग करू नका.  स्वतःची स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला राजनाथ सिंह यांनी विद्यार्थ्यांना दिला. 

 सध्याच्या काळात संरक्षण क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या तरुणांची देशाला गरज आहे. त्याचवेळी लष्करी अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम सिंबायोसिसने सुरू केला आहे. हा निर्णय दूरदृष्टीचा आणि धोरणीपणाचा आहे. याचा देशाला निश्चितच उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही, अशी खात्रीही राजनाथसिंह यांनी व्यक्त केली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील संरक्षण क्षेत्रातील अभ्यासक्रम सुरू केल्याबद्दल सिम्बायसिसचे कौतुक केले. ज्या काळात सण 2017 18 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकासाचे महत्त्व ओळखले साधारणपणे त्याच काळात मुजुमदार यांनी त्याच दिशेने विचार करत कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठाची स्थापना केली. हे विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचे झाले आहे. भारत सरकारने या विद्यापीठाला अव्वल दर्जा दिला आहे. लवकरच विद्यापीठाचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवरही झाल्याशिवाय राहणार नाही, अशी खात्री फडणवीस यांनी व्यक्त केली. 

वसुधैव कुटुम्बकम, या प्रेरणेतूनच सिंबायोसिस विद्यापीठाची स्थापना झाल्याचे डॉ मुजुमदार यांनी सांगितले. सिंबायोसिसचा पदवीधर हा वैश्विक दर्जाचा पदवीधर असतो. केवळ नोकरी पुरते औपचारिक शिक्षण न देता विद्यार्थ्यांमध्ये मानवता आणि राष्ट्रीयत्वाची मूल्य रुजवण्याचे काम विद्यापीठात केले जाते, असे डॉ मुजुमदार यांनी सांगितले.

About The Author

Advertisement

Latest News

लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा पुढाकार  लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा पुढाकार 
पुणे: प्रतिनिधी  लघु व मध्यम उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. याला...
भ्रष्टाचार मुक्त वडगांव करण्यासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही – भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण
'भाजप हा कपटकारस्थान, दगाफटका करणारा पक्ष'
संविधान दिनानिमित्त रंगणार 'संविधान लोककला शाहिरी जलसा
नवले पुलावर नागरिकांनी घातला प्रशासनाचा दशक्रिया विधी
विद्यार्थ्यांच्या समयसूचकतेमुळे बिबट्याने ठोकली धूम
भाजपचा उगवता तारा - प्रमोद हरिभाऊ बाणखेले

Advt