- देश-विदेश
- 'संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच इथपर्यंत पोहोचलो'
'संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच इथपर्यंत पोहोचलो'
मावळते सरन्यायाधीश भूषण गवई यांचे कृतज्ञ उद्गार
नवी दिल्ली: प्रतिनिधी
घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी या देशाला दिलेले संविधान यामुळेच मी सरन्यायाधीश पदापर्यंत पोहोचलो. अन्यथा नगरपालिकेच्या शाळेत शिकलेल्या सामान्य मुलाला एवढे मोठे स्वप्न पाहणे शक्य नव्हते, असे कृतज्ञ उद्गार मावळते सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काढले.
सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड असोसिएशनच्या वतीने सरन्यायाधीश गवई यांना निरोप देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. गवई उद्यापासून सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होत आहेत. देशाच्या न्यायपाधिकेने आपल्याला खूप काही दिल्याचे गवई यांनी यावेळी नमूद केले.
मी व्यक्तीशः बौद्ध धर्माचा अनुयायी आहे. मात्र प्रत्यक्षात माझा धर्माचा मोठा अभ्यास नाही. खरंतर मी सर्वधर्मसमभाव मानणारा माणूस आहे. माझ्या वडिलांचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे. ते स्वतः सर्वधर्मसमभाव मानणारे होते आणि त्यांनी तेच संस्कार आमच्यावर केले, असे गवई यांनी यावेळी सांगितले.
संविधानाचे चार आधारस्तंभ असलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचे पालन करण्याचा प्रयत्न आपण आयुष्यभर केल्याचे गवई म्हणाले. सर्वोच्च न्यायालय हे सरन्यायाधीशकेंद्री न राहता ते सर्व न्यायामूर्तींचे व्हावे, अशी आपली इच्छा असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.

