पुणे: प्रतिनिधी
मान्सूनच्या परतीची वेळ आली असून देखील राज्यभरात पावसाचा कहर सुरूच आहे. चार दिवस उघडीप दिल्यानंतर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पाऊस पुन्हा कोसळायला सुरुवात झाली आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, जालना आणि रायगड यांच्यासह पुणे, नाशिक घाटमाथा परिसराला हवामानशास्त्र विभागाने रेड अलर्ट अर्थात अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. मुंबईत सध्या पावसाची रिमझिम सुरू असली तरी पुढील ४८ तासात पुणे, मुंबईला यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असून खडकवासला धरणातील विसर्ग वाढवण्यात आला आहे. जालना, अमरावती जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस सुरू आहे.
यावर्षी अतिवृष्टीने राज्याच्या बहुतेक भागांना अक्षरशः झोडपून काढले आहे. पूरस्थितीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. खरिपाचे पीक पूर्णपणे वाहून गेले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरून संसार रस्त्यावर आले आहेत. शेकडो जनावरे वाहून गेली आहेत. जमीन खरडून शेतातील माती वाहून गेली आहे. एवढे होऊनही पाऊस अद्याप परतीचे नाव घेत नसल्याने नागरिक आणि प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.