- राज्य
- ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानावर ड्रोनच्या घिरट्या
ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानावर ड्रोनच्या घिरट्या
परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ
मुंबई: प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री इमारतीवर अज्ञात ड्रोन घिरट्या घालत असल्याचे सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास आले. या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली असून परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे.
वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानातून अज्ञात ड्रोन घिरट्या घालत असल्याचे सुरक्षारक्षकांच्या लक्षात आली. त्यांनी या ड्रोनचे चित्रीकरण केले. ते समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत आहे. भारतीय जनता पक्षाकडून ठाकरे यांच्या निवासस्थानाकडे नजर ठेवली जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे.
उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना हा प्रकार घडला आहे. ठाकरे यांच्या निवासस्थानी कोणाची ये जा होत आहे याकडे भाजपकडून लक्ष ठेवले जात आहे, असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिंबू टिंबू लोकांना सुरक्षा प्रदान केली आहे. मात्र, मातोश्री निवासस्थानावरील सुरक्षा कमी करण्यात आली आहे, असा आरोप त्यांनी केला. मत चोरी प्रकरण उघड झाल्यानंतर भाजपच्या गोटात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यातूनच हे प्रकार घडत असल्याची टीकाही अंधारे यांनी केली.

