- राज्य
- भाजपने दिली एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी
भाजपने दिली एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी
लोहा नगरपरिषद निवडणुकीत घराणेशाही
नांदेड: प्रतिनिधी
लोहा नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी एकाच कुटुंबातील सहा जणांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून भाजपचे सर्व नेते घराणेशाहीवर टीका करत असताना त्यांनीच अशी उमेदवारी दिल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
लोहा नगरपरिषद निवडणुकीत गजानन सूर्यवंशी हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. त्यांच्यासह त्यांच्याच कुटुंबातील सहा जणांना पक्षाने विविध प्रभागात नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे विरोधकांकडून टीका होण्याबरोबरच पक्षांतर्गत नाराजीची शक्यता देखील वर्तवली जात आहे. मात्र, स्वतः सूर्यवंशी यांनी पक्षाच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे.
भारतीय जनता पक्षात निवडणुकीची उमेदवारी देण्यासाठी कठोर निकष आहेत. आमच्यापैकी ज्यांना आता उमेदवारी मिळाली आहे त्यांच्यातील अनेक जण यापूर्वी त्यांच्या त्यांच्या प्रभागात नगरसेवक राहिले आहेत. त्यांनी त्यांच्या प्रभागाचे जबाबदारीने पालन केले आहे. पक्षाच्या निकषानुसार आम्ही सर्वजण उमेदवारीसाठी पात्र आहोत. आमच्या उमेदवारीमुळे पक्षात कोणत्याही प्रकारचा असंतोष नाही, असा दावा सूर्यवंशी यांनी केला आहे.

