- राज्य
- समाजाकडून घेताना काही देणेही आवश्यक — सुशील बियानी
समाजाकडून घेताना काही देणेही आवश्यक — सुशील बियानी
तापडिया लाइफ सायन्सेसच्या नवीन अत्याधुनिक कार्यालयाचे उद्घाटन
पुणे : प्रतिनिधी
“व्यवसायाच्या माध्यमातून समाजाकडून आपण बरेच काही घेतो, त्यामुळे समाजाप्रती जबाबदारी म्हणून त्याला काहीतरी परत देणे अत्यावश्यक आहे,” असे मत तापडिया लाइफ सायन्सेसचे संचालक सुशील बियानी यांनी व्यक्त केले.
तापडिया लाइफ सायन्सेसच्या नवीन अत्याधुनिक कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते. या नवीन वास्तूचे लोकार्पण ब्रिजलाल बियानी आणि उषा बियानी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ओमप्रकाश तापडिया, जुगल किशोर तापडिया, अनुप तापडिया, डॉ. विशाल तापडिया, सुनील शहा, प्रशांत अग्रवाल यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बियानी म्हणाले, “अत्यावश्यक व दुर्मिळ औषधांचा वेळेवर आणि जबाबदारीने पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र आणि सक्षम यंत्रणा उभारत 2008 मध्ये तापडिया लाइफ सायन्सेसची स्थापना करण्यात आली. कर्करोग, आयसीयू व क्रिटिकल केअर, प्रतिरक्षा विज्ञान, वृक्करोग, नेत्ररोग, रक्तरोग, प्लाझ्मा उत्पादने, एचव्ही (उच्च मूल्य) उपचार, संधिवात विज्ञान अशा गंभीर रोगांच्या उपचारांसाठी लागणारी जीवनावश्यक औषधे आम्ही काळजीपूर्वक उपलब्ध करून देतो. यामध्ये शंभर रुपये किमतीपासून ५ लाख रुपयांपर्यंतच्या इंजेक्शन आणि औषधांचा समावेश होतो”
सध्या तापडिया लाइफ सायन्सेसकडून राज्यभरातील 500 पेक्षा अधिक रुग्णालयांना औषधांचा पुरवठा केला जातो. एकूण पुरवठ्यातील ७० टक्के औषधं थेट रुग्णालयांना, तर उर्वरित मोठ्या औषध दुकाने व वितरकांना दिली जातात.
देशातील आघाडीच्या तसेच नामांकित बहुराष्ट्रीय अशा एकूण ५५ औषध उत्पादक कंपन्यांची दुर्मिळ औषधे तापडिया लाइफ सायन्सेस वितरित करते. त्यापैकी काही विशेष औषधांचे महाराष्ट्र व दक्षिण भारतातील वितरणाचे विशेष हक्क केवळ तापडिया लाइफ सायन्सेसकडे असल्याची माहिती बियानी यांनी दिली.
“अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन आणि थेट रुग्णापर्यंत योग्यवेळी औषध पोहोचवण्याची अचूक प्रणाली हे आमच्या सेवांचे मुख्य वैशिष्ट्य आहे,” असेही बियानी यांनी सांगितले. औषधांची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी योग्य तापमान नियंत्रण, शिस्तबद्ध साठवण आणि कमी मानवी हाताळणी यावर कंपनीचा विशेष भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे तापडिया लाइफ सायन्सेसच्या शाखा कार्यरत आहेत. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या प्रदेशांमध्ये कंपनीचा पुरवठा मोठ्या प्रमाणात असून लवकरच देशव्यापी विस्तार करण्याचा निर्धार असल्याचे बियानी यांनी सांगितले.

