- राज्य
- निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का
युवा सेनेच्या तब्बल 300 कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
जळगाव: प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर युवा सेनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि तब्बल 300 युवा शिवसैनिकांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. या निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवारांना पूर्ण ताकदीने निवडून आणू, अशी ग्वाही यावेळी प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे दिली.
युवा सेनेचे महानगर प्रमुख यश इंद्रराज सपकाळे व गजू कोळी यांच्यासह 300 कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे महानगराध्यक्ष संतोष पाटील हे देखील उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण पक्ष प्रवेश करत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक व त्यानंतरही पक्षासाठी आणि जनसेवेसाठी अविरत कार्यरत राहू, असे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश करताना सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवा कार्यकर्त्यांनी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्यामुळे पक्षाला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाठबळ मिळाले आहे, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी बोलताना नमूद केले.

