- राज्य
- आरक्षण हा 'गरिबी हटाव'चा कार्यक्रम नाही
आरक्षण हा 'गरिबी हटाव'चा कार्यक्रम नाही
छगन भुजबळ यांचे परखड मत
मुंबई: प्रतिनिधी
सामाजिक मागासलेपण हा आरक्षणाचा मूळ पाया आहे. आरक्षण हा गरिबी हटाव चा कार्यक्रम नाही. आर्थिक निकषावर आरक्षण दिले जाऊ शकत नाही, असे परखड मत ज्येष्ठ मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी आर्थिक निकषावर आरक्षण दिले जावे, असे मत व्यक्त केले होते. खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. त्यांच्या मताला भुजबळ यांनी विरोध व्यक्त केला आहे.
गरिबी हटवण्यासाठी आपण शेतकऱ्यांना मदत देत आहोत. ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सर्व सवलती मराठा विद्यार्थ्यांना देखील मिळत आहेत. इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह नाही ते मराठा विद्यार्थ्यांसाठी आहे. उद्योजक घडवण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे.
मात्र, आरक्षण हा विषय केवळ सामाजिक मागासलेपणावर आधारित आहे. जे सामाजिक दृष्ट्या मागासलेले नाहीत त्यांना आरक्षण मिळू शकणार नाही. मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागासलेला नाही. आतापर्यंत देशमुख आयोग, खत्री आयोग, बापट आयोग, सराफ आयोग या चार आयोगांनी ही बाब स्पष्ट केलेली आहे. उच्च न्यायालयाने निकालात देखील हेच नमूद केले आहे, याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले.