कराडमधून खोट्या नावाने चार टन शेंगदाण्याचा माल उचलून व्यापाऱ्याची साडेतीन लाखांची फसवणूक
हुबळी येथील एकावर गुन्हा
कराड प्रतिनिधी
चार टन शेंगदाणा खरेदी करून त्याचे पैसे न देता व्यापाऱ्याची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश यतिश शहा (रा. सोमवार पेठ, कराड) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार पेठेत राहणारे यश शहा हे बाजार समितीतील गेट नंबर एक येथे ‘मधुर ट्रेडर्स’ नावाने व्यापार करतात. २ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी एक व्यक्ती त्यांच्या दुकानात आला. त्याने स्वतःचे नाव ‘बशीर गोंजल’ असल्याचे सांगत कोल्हापुरातील 'महालक्ष्मी ट्रेडर्स' या मोठ्या दुकानासाठी शेंगदाणा हवा असल्याचे सांगितले.
त्याने चार टन शेंगदाणा खरेदी केला आणि माल शहा यांच्या वाहनातूनच कोल्हापूरला पोहोचवण्यास सांगितले. तसेच, 'माल पोहोचल्यावर संबंधित ट्रकचालकाला पेमेंट देतो,' अशी हमीही दिली.
यश शहा यांनी त्यानुसार ट्रकमध्ये माल भरून कोल्हापूरला पाठवला. मात्र, तेथे पोहोचताच संबंधित व्यक्तीने ट्रक एका पेट्रोल पंपावर थांबवून शेंगदाण्याचा संपूर्ण माल दुसऱ्या ट्रकमध्ये चढवला. त्यानंतर ट्रकचालकाला 'मी लगेच पैसे घेऊन येतो,' असे सांगून तो निघून गेला. पण तो पुन्हा परतलाच नाही.
शहा यांनी वारंवार फोन करूनही त्याने पैसे देण्यास टाळाटाळ सुरूच ठेवली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील व्यापारी जितेंद्र चव्हाण यांनी यश शहा यांना फोन करून, 'तुमचा शेंगदाण्याचा माल चोरीस गेला आहे का? कारण असाच माल विक्रीसाठी माझ्याकडे आला आहे,' अशी विचारणा केली.
चव्हाण यांनी तपासादरम्यान असेही सांगितले की, ‘बशीर गोंजल’ असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीचे खरे नाव हजारेसाब बिजापूर (रा. हुबळी, कर्नाटक) आहे. यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच यश शहा यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
या व्यवहारात अंदाजे साडेतीन लाख रुपयांचा माल गेला असून, पोलिसांनी हजारेसाब बिजापूर या संशयित आरोपीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. कराड पोलिसांकडून संशयीताचा शोध घेण्यात येत असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचीही चौकशी सुरू आहे.
000

