- राज्य
- बिग बी धर्मेंद्र यांचा समाचार घेण्यासाठी रवाना...
बिग बी धर्मेंद्र यांचा समाचार घेण्यासाठी रवाना...
स्वतः इलेक्ट्रिक कार चालवत अमिताभ मित्राच्या भेटीला
मुंबई: प्रतिनिधी
बिग बी अमिताभ बच्चन यांचा जुहू परिसरातील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या बंगल्याजवळ इलेक्ट्रिक कार स्वतः चालवत येत असल्याचा व्हिडिओ काल रात्री सर्वत्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. त्यांच्या येण्याची चाहूल लागताच धर्मेंद्र यांच्या बंगल्यासमोर चाहत्यांची मोठी गर्दी जमली.
धर्मेंद्र यांची प्रकृती मागील काही काळापासून अस्वस्थ आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करून उपचारही करण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना त्यांच्या घरी नेऊन उपचार करण्यात येत आहेत. यावेळी त्यांच्या पत्नी हेमामालिनी, सर्व सहा मुले आणि मुली धर्मेंद्र यांची देखभाल करत आहेत.
भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या शोले या चित्रपटातील जय आणि वीरू या मित्रांची जोडी अनेक दशकांपासून आजही लोकप्रिय आहे. शोले चित्रपटाप्रमाणेच गुड्डी आणि अन्य काही चित्रपटांमध्ये धर्मेंद्र आणि अमिताभ यांनी एकत्र काम केले आहे. व्यक्तिगत पातळीवर देखील त्यांच्यात चांगली मैत्री आहे.
धर्मेंद्र घरी आले याचा आनंद आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीची आम्हा सर्वांना काळजी आहे. अशा प्रसंगात मी भावनिकदृष्ट्या खंबीर राहणे गरजेचे आहे. कृपया, चाहत्यांनी आमच्यासाठी प्रार्थना करावी, असे आवाहन हेमा मालिनी यांनी चाहत्यांना केले आहे.

