- राज्य
- अल्पवयीनांच्या सुरक्षेबाबत अधिक संवेदनशील व सतर्क होणे गरजेचे
अल्पवयीनांच्या सुरक्षेबाबत अधिक संवेदनशील व सतर्क होणे गरजेचे
बालिकेवरील अमानुष अत्याचार प्रकरणी डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पोलिसांना निर्देश
पुणे: प्रतिनिधी
ओतूर (ता. जुन्नर) येथील स्थानिक गरीब शेतकरी कुटुंबातील सात वर्षीय निरागस बालिकेवर १६ नोव्हेंबर २०२५ रोजी अत्यंत अमानुष लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर शिवसेना नेत्या, विधानपरिषद उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने दखल घेत पोलिस प्रशासनाशी संपर्क साधला.
प्राथमिक चौकशीनुसार, आरोपी हा ऊसतोड मुकादमाचा मेहुणा असून संबंधित मुकादम मागील दहा वर्षांपेक्षा अधिक काळ त्या परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वीदेखील आरोपीने पीडितेच्या मोठ्या बहिणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक तपास समोर आला आहे. गुन्ह्यानंतर आरोपीने पळण्याचा प्रयत्न केला; मात्र संतप्त ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तत्काळ अटक करून पॉक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत गंभीर गुन्हा नोंदवला आहे.
पिडीत बालिका सध्या गंभीर मानसिक धक्क्यात असून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अनिता शिंदे आणि प्रतिभा राऊत यांनी रुग्णालयात भेट देऊन पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाची विचारपूस केली. डॉ.गोऱ्हे यांच्याकडून कुटुंबाला तत्काळ आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात आले आहे.
दरम्यान, उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. ताटे यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आणि तसेच पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक श्री. संदीपसिंह गिल यांना अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांबाबत पोलिस यंत्रणांनी अधिक संवेदनशीलता, सतर्कता आणि कठोर कायदेशीर भूमिका घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री ना.श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.श्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसेच पोलिस अधीक्षकांना पाठवलेल्या निवेदनात खालील प्रमुख मुद्द्यांना प्राधान्य देण्याची मागणी केली आहे—
• शेतमजूर व कामगारांच्या दूरस्थ वस्त्यांमध्ये रात्रगस्त वाढवून विशेष सुरक्षा पथक तैनात करणे
• महिलां–मुलांसाठी हेल्पलाईन, प्रकाशयोजना आणि तातडीची मदत केंद्रे उपलब्ध करून देणे
• आरोपीच्या पूर्वीच्या गुन्हेगारी नोंदींची तपासणी करून आवश्यक असल्यास एमपीडीए (MPDA) अंतर्गत कारवाई करणे
• पीडित मुलगी आणि तिच्या बहिणीच्या संबंधित प्रकरणातील पुरावे काटेकोरपणे संकलित करून फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी सुनिश्चित करणे
• मनोधैर्य योजनेतील आर्थिक सहाय्य तत्काळ मंजूर करणे
• कुटुंबाला वैद्यकीय, मानसशास्त्रीय आणि कायदेशीर मदत सातत्याने उपलब्ध करून देणे
“अल्पवयीन बालिकांवरील अत्याचार हा समाजाच्या सुरक्षिततेला थेट धोका आहे. अशा गुन्ह्यांविरुद्ध शून्य सहिष्णुतेची भूमिका घेणे अत्यावश्यक आहे. पीडितेला न्याय मिळेपर्यंत आणि सुरक्षित वातावरण मिळेपर्यंत माझा पाठपुरावा सुरू राहील,” असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणात पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई केली असली, तरी आरोपीला कठोर शिक्षा होऊन पीडित बालिकेला न्याय मिळावा यासाठी डॉ. गोऱ्हे यांच्या पुढाकाराने पुढील कार्यवाही अधिक वेगाने सुरू आहे.

