- राज्य
- वडगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रिया सुरू
वडगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रिया सुरू
पहिल्याच दिवशी एकही अर्ज दाखल नाही
वडगाव मावळ प्रतिनिधी │ प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाने वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठीचा कार्यक्रम ४ नोव्हेंबर रोजी घोषित केला असून, त्या अनुषंगाने आजपासून (१० नोव्हेंबर) नामनिर्देशन अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया औपचारिकपणे सुरू झाली आहे. ही प्रक्रिया १७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत (रविवार १६ नोव्हेंबर वगळता) दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत वडगाव नगरपंचायत कार्यालयात सुरू राहणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मनिषा तेलभाते व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रविण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण निवडणूक कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी सुरू आहे.
नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदांसाठी अर्ज स्वीकृतीसाठी आज वडगाव नगरपंचायत कार्यालयात प्रभागनिहाय (प्रभाग क्र. १ ते १७) टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्र भरताना https://mahaseccles.in या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करून आवश्यक माहिती भरावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
निवडणूक प्रक्रियेसाठी कार्यालयात एकूण ७ टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे —
टेबल क्र. १: अनामत रक्कम पथक
टेबल क्र. २: तपासणी पथक (नगराध्यक्ष व प्रभाग क्र. १ ते ४)
टेबल क्र. ३ ते ५: तपासणी पथक (प्रभाग क्र. ५ ते १७)
टेबल क्र. ६: अर्ज स्वीकृती पथक
टेबल क्र. ७: संगणकीकरण व छपाई पथक
नामनिर्देशनपत्रांची तपासणी आणि स्वीकृतीसाठी वडगाव नगरपंचायत, पंचायत समिती तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले पथक कार्यरत आहे.
पहिल्या दिवशी म्हणजेच आज (१० नोव्हेंबर) एकही नामनिर्देशनपत्र प्राप्त झालेले नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मनिषा तेलभाते यांनी दिली. पुढील काही दिवसांत उमेदवारांकडून अर्ज दाखल होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पडावी यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी ४ वाजता बैठक घेण्यात आली. या बैठकीत स्थिर देखरेख पथक (Static Surveillance Team) आणि भरारी पथक (Flying Squad Team) यांची स्थापना करण्यात आली. बैठकीदरम्यान सर्व अधिकारी व कर्मचारी यांना निवडणुकीसंबंधी जबाबदाऱ्या आणि मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.
वडगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी आता प्रशासनिक तयारी पूर्ण झाली असून, येत्या काही दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची चळवळ वाढण्याची चिन्हे आहेत.
About The Author

