- राज्य
- राज्याच्या काही भागात कडाक्याच्या थंडीचा इशारा
राज्याच्या काही भागात कडाक्याच्या थंडीचा इशारा
उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणाम
पुणे: प्रतिनिधी
उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात तापमानाचा पारा अधिक खाली येण्याची शक्यता असून काही भागात लाट सदृश कडाक्याची थंडी अनुभवायला मिळेल असा इशारा भारतीय हवामानाशास्त्र विभागाने दिला आहे.
यावर्षी राज्यात पावसाने मोठे थैमान घातले. पावसाचे प्रमाण आणि कालावधी देखील वाढला. आता राज्याच्या बहुतेक भागात थंडीचा कडाका वाढला आहे. मुंबईतही रात्री, पहाटे थंडी पडताना दिसून येत आहे.
पुढील काही काळामध्ये तापमानात अधिक घट होण्यापेक्षा असून विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे, असा इशारा हवामानशस्त्र विभागाने दिला आहे. सध्याही उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव विदर्भातील गोंदिया अशा जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी आणि धुक्याची चादर अनुभवता येत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली गेला आहे.
देशाच्या उत्तर आणि दक्षिण भागामध्ये वातावरणात टोकाचा फरक बघायला मिळत आहे. उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीची लाट येण्याचा इशारा दिला जात आहे तर दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेश या राज्यात अद्यापही पाऊस सुरू आहे. या राज्यांच्या काही भागांना अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

