'युती धर्म पाळण्याची जबाबदारी सर्वांनीच पार पाडावी"
देवेंद्र फडणवीस यांनी टोचले शिंदे गटाच्या मंत्र्यांचे कान
मुंबई: प्रतिनिधी
युतीचे सरकार सत्तेवर असताना युतीधर्मा पाळण्याची जबाबदारी कुठल्या एका पक्षावर नसते तर सर्वच घटक पक्षांवर असते. याची जाणीव ठेवून सर्वांनीच युती धर्माचे पालन करावे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटातील मंत्र्यांचे कान टोचले.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी बहिष्कार घातला. त्यामागे वेगवेगळ्या कारणांची चर्चाही झाली. अखेर त्यामागील खरे कारण ऑपरेशन लोटस राबवून भारतीय जनता पक्ष केवळ विरोधी पक्षातीलच नव्हे तर मित्र पक्षातील माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना गळाला लावत असल्याचा आरोप शिंदे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलताना केला. मुख्यतः त्यांचा रोष भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी या आरोपाचा समाचार घेत शिंदे गटाच्या मंत्र्यांनाच धारेवर धरले.
युती सरकार सत्तेत असताना काही प्रमाणात मतभेद होणे स्वाभाविक आहे. मात्र, मित्र पक्षांचे नेते आपल्या पक्षात सामावून घेण्याबाबत उल्हासनगर मध्ये सुरुवात तुम्ही केली. मग आम्ही तरी का मागे राहू, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांना केला. इथून पुढे एकमेकांच्या पक्षातील नेत्यांना प्रवेश देऊ नका. लवकरच महायुतीच्या समन्वय समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत या विषयावर गांभीर्याने चर्चा केली जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या भावासह शिंदे गटातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकारातून पक्षांतर केले. आजच सकाळी शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात शिवसेनेचे तत्कालीन जुने जाणते नेते वामन म्हात्रे यांचे पुत्र अनमोल म्हात्रे यांचा रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झाला. असेच प्रकार अनेक ठिकाणी झाल्यामुळे शिंदे गटातील मंत्री नाराज झाले आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या सडेतोड उत्तरानंतर ही नाराजी फार काळ टिकण्याची शक्यता कमी आहे.

