- राज्य
- 'अस्लम शेख यांची आपल्यासह कुटुंब संपवण्याची धमकी'
'अस्लम शेख यांची आपल्यासह कुटुंब संपवण्याची धमकी'
मंगल प्रभात लोढा यांची मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार
मुंबई :प्रतिनिधी
घुसखोर रोहिंग्या आणि बांगलादेशींना पाठीशी घालणारे मालाड मालवणीचे आमदार अस्लम शेख यांच्या बेकायदेशीर कामांना विरोध केल्यामुळे त्यांनी भर कोपरासभेत आपल्यासह आपले कुटुंब संपविण्याची धमकी दिल्याचा आरोप मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केला आहे.
लोढा यांनी याबाबत मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी देखील या कथित धमकावणीचा निषेध केला असून पोलिसांनी शेख यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मालवणीमध्ये शेख यांनी बेकायदेशीर बांधकामांची पाठराखण करून त्या ठिकाणी रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना आश्रय देण्याचे देशद्रोही कृत्य केले आहे. याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करून कारवाई करण्यासाठी आपण पुढाकार घेतला. या कारवाई आत्तापर्यंत तब्बल 9 हजार चौरस मीटर शासकीय जमीन मोकळी करण्यात आली आहे. ही कारवाई अद्याप सुरू आहे, असे लोढा यांनी पत्रात नमूद केले आहे.
या कारवाईसाठी आपण पुढाकार घेऊन असे प्रकार पुन्हा खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा दिल्यामुळेच आमदार शेख. आपल्याला धमक्या देत आहेत. त्या खेरीज अतिक्रमणविरोधी कारवाईला विरोध करत आहेत, असेही लोढा यांनी पत्रात नमूद केले आहे.
एकीकडे मुंबईसारखे महानगर दहशतवाद्यांच्या रडारवर असताना घुसखोरीला पाठिंबा देऊन आमदार शेख देशाची सुरक्षा धोक्यात आणत आहेत. त्यासाठी त्यांनी शासकीय जमिनी बळकाव्याच्या, त्यावर अनधिकृत बांधकामे उभी करायची आणि त्यात रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना आश्रय द्यायचा, असा मालवणी पॅटर्न अमलात आणला आहे. मात्र, हा मालवणी पॅटर्न आपण उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मंगल प्रभात लोढा यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

