- राज्य
- 'शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईची रक्कम तुटपुंजी, तरीही...'
'शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईची रक्कम तुटपुंजी, तरीही...'
दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्याचे कृषिमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
अहिल्यानगर: प्रतिनिधी
आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी जाहीर करण्यात आलेली नुकसान भरपाईची रक्कम नुकसानाचे प्रमाण लक्षात घेता तुटपुंजीच आहे. मात्र, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि दिवाळीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाईची रक्कम देण्यात येईल, असे आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना दिले.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याबरोबरच त्यांना दिलासा देण्यासाठी सर्व मंत्री आपत्तीग्रस्त परिसराच्या दौऱ्यावर आहेत. त्यानुसार भरणे हे देखील अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
यावेळी भरणे यांनी अधिकाऱ्यांना देखील महत्त्वाच्या सूचना केल्या. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे वेगाने पूर्ण करा. एक गुंठा क्षेत्र देखील पंचनाम्याशिवाय राहू देऊ नका. पंचनामे करण्यात कुचराई करू नका. तुम्हाला पुण्य कमावण्याची मोठी संधी परमेश्वराने दिली आहे त्या संधीचा लाभ घ्या, असे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले.
राज्याच्या बहुतेक भागात यावर्षी अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः मराठवाड्याच्या सोलापूर लातूर धाराशिव अहिल्यानगर बीड या जिल्ह्यांमधील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. शेतातील पीक वाहून गेले आहे. इतकेच नाही तर अनेकांच्या शेतातील माती देखील खरडून वाहून गेली आहे. गुरे ढरे वाहून गेली आहेत घरांचे नुकसान झाले आहे.. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी सरकारने २०२११ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे.