- राज्य
- 'विकसित भारताचे स्वप्न बघताना 4-जी तंत्रज्ञान क्रांती घडवेल'
'विकसित भारताचे स्वप्न बघताना 4-जी तंत्रज्ञान क्रांती घडवेल'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
भारत संचार निगम लिमिटेडच्या 4-जी तंत्रज्ञानाचा शुभारंभ
पुणे : प्रतिनिधी
बीएसएनएलद्वारे निर्मिती पूर्णत: स्वदेशी 4-जी प्रणालीद्वारे अनेक गावे एकमेकांशी जोडली जाणार असून यातून देशातील खेड्यापाड्यातील जनता जगाशी संपर्क साधू शकणार आहे. या प्रणालीच्या वापराद्वारे आरोग्य, शिक्षण, शेती, उद्योग-व्यवसाय अशा विविध व्यवस्थांशी एका क्लिकवर संपर्क साधू शकता येणार आहे. ज्यामुळे सर्व स्तरातील नागरिकांना विविध सुविधांचा सहजतेने लाभ घेता येणार आहे. या प्रणालीद्वारे शासकीय कामकाजात पारदर्शकता निर्माण होणार आहे. तंत्रज्ञान हे व्यक्ती, जात-धर्म, गरिबी-श्रीमंती बघत नसते, तर ती भेदरहित पारदर्शी व्यवस्था असते. स्वदेशीचा नारा देत विकसित भारताचे स्वप्न बघताना हे आधुनिक तंत्रज्ञान मोठी क्रांती घडवेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
आत्मनिर्भर भारत या उपक्रमाअंर्गत देशात विकसित करण्यात आलेल्या भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) 4-जी तंत्रज्ञानाचा शुभारंभ आज (दि. 27) ओडिशा राज्यातील झारगुडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. महाराष्ट्रातील या सेवेचा प्रारंभ पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सिद्धार्थ शितोळे, बापूसाहेब पठारे, भीमराव तापकीर, एअर टेलचे चेअरमन सुनील मित्तल, आर. के. गोयल, बीएसएनएल दिल्लीचे मानव संसाधन अधिकारी कल्याण निपाणी, राज्याचे मुख्य महाव्यवस्थापक हरिंदर कुमार मक्कर, नाना भानगिरे, जगदिश मुळीक, धीरज घाटे आदी मंचावर होते.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, देशाला विकासाच्या प्रगतीपथावर आणण्यास संपर्क तंत्रज्ञानाचे महत्त्व मोठे आहे. या तंत्रज्ञानातून गावागावांचा विकास घडू शकतो. स्वदेशीचा नारा देत देशातील कंपन्यांना एकत्रित करून बीएसएनएलने निर्मित केलेली 4-जी यंत्रणा 5-जीपर्यंत विकसित होऊ शकेल. जेव्हा-जेव्हा देशासमोर आव्हाने आली किंवा देशावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा ज्ञान, तेज, कर्तव्यता एकत्रित करून देशाने जगाला समर्थपणे उत्तर दिले आहे. या निर्मितीमुळे संपूर्ण स्वदेशी प्रणाली विकसित करणारा भारत देश हा जगाच्या पाठीवरील पाचवा देश बनला आहे.
राज्य शासनाच्या 1100 सेवा लवकरच ऑनलाईन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत या संकल्पनेला साकार करण्यासाठी बीएसएनएलच्या 100 टक्के स्वदेशी बनावटीच्या 4-जी प्रणालीचा मोठा हातभार लागणार आहे, असे सांगून देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, राज्य सरकारने लवकरच अकराशे सेवा ऑनलाईन प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवा कार्यान्वित होण्यासाठी गावोगावी पोहोचणारी स्वदेशी 4-जी प्रणाली उपयुक्त ठरणार असून याचा उपयोग खेड्यापाड्यातील, आदिवासी भागातील नागरिकांना होणार आहे.
भारत नावाच्या शक्तीची उंच झेप
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, औद्योगिक क्रांतीनंतर देशासाठी हा मोठा अभिमानाचा क्षण आहे. पंतप्रधान मोदी यांची दूरदृष्टी आणि दृढनिश्चय यातून देशाने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. बीएसएनएलच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा क्रांतीचा ध्वज या स्वदेशी प्रणालीच्या निर्मितीतून फडकत राहणार आहे. भारत नावाच्या शक्तीची ही उंच झेप आहे. या निर्मितीद्वारे देशाची आत्मनिर्भरतेकडे जोमाने वाटचाल सुरू आहे. तोट्यात असलेले बीएसएनएल 18 वर्षांनंतर 262 कोटी रुपयांचा नफा कमवू शकले आहे. या प्रणालीचा ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार असून 2047 पर्यंत विकसित भारताच्या स्वप्नांना नवे बळ मिळाले आहे. देशाची वाटचाल सशक्त आणि सक्षमतेकडे होत आहे. विकास आणि ज्ञानाच्या यज्ञात महाराष्ट्र मागे राहणार नाही, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.
खेड्यापाड्यांचा विकास साधला जाणार
रक्षा खडसे म्हणाल्या, पंतप्रधान मोदी यांनी पाहिलेले आत्मनिर्भर व विकसित भारताचे स्वप्न बीएसएनएलच्या पूर्णत: स्वदेशी तंत्रज्ञानाने पूर्णत्वास जात आहे. ग्रामीण व आदिवासी क्षेत्रात हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर पोहोचणार असून 25 हजारांहून अधिक गावांमध्ये या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व स्तरांवर विकास साधला जाणार आहे. स्वदेशी बनावटीच्या तंत्रज्ञानामुळे देशाची सुरक्षितता जपली जाणार आहे. बीएसएनएलने केवळ 22 महिन्यांमध्ये हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
स्वागतपर प्रास्ताविकात हरिंदर कुमार मुक्कर म्हणाले, हा प्रारंभ केवळ तांत्रिक प्रगतीचे प्रतिक नाही तर दूरसंचारच्या नवकल्पना व उत्पादन क्षेत्रात भारताच्या जागतिक नेतृत्वाचे द्योतक आहे. या तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण, आरोग्य, शेती आणि उद्योग क्षेत्रात सक्षमता येईल व आर्थिक सक्षमीकरणास गती मिळेल.