- राज्य
- 'दादांच्या कार्यालयात गुन्हेगारांचा वावर'
'दादांच्या कार्यालयात गुन्हेगारांचा वावर'
रवींद्र धंगेकर यांचा चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप
पुणे: प्रतिनिधी
ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांचा वावर असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. दादांकडून केली जाणारी गुंडांची पाठराखण पुणे शहरासाठी घातक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
मागील काही काळापासून पुण्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती आणि वाढती गुन्हेगारी याची चर्चा होत आहे. कुख्यात गुंड निलेश घायवळ याने परदेशात पलायन केल्यानंतर त्याला पळून जाण्यास कोणी मदत केली याचीही चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर धंगेकर यांनी केलेल्या आरोपाचे गांभीर्य वाढले आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयात समीर पाटील नावाचा गुंड असतो. त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा वापर करून पोलिसांना धमक्या दिल्या जातात. दादांच्या फोनचा वापर करून तो पोलिसांच्या बदल्या करतो, असे आरोप धंगेकर यांनी केले आहेत.
चंद्रकांत पाटील यांना पुणेकरांनी सलग दहा वर्ष निवडून दिले आहे. मात्र, चंद्रकांत पाटील यांच्याकडून गुन्हेगारांची पाठराखण कली जात आहे. निवडणुकीच्या काळात पाटील यांना हे गुंड उपयोगी पडत असतील तरी पुणेकरांसाठी ही बाब घातक आहे, असेही धंगेकर म्हणाले.
धंगेकर यांच्या या आरोपांना भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सध्या धंगेकर हे आमदार नाहीत. त्यामुळे त्यांना प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी अशी विधाने करावी लागतात, असा टोला त्यांनी लगावला आहे तर दरेकर हे पुण्याचे नाहीत. त्यांना पुण्याची परिस्थिती माहिती नाही. त्यांना पुण्यात बोलवून लोक काय म्हणतात ते ऐकवणार आहे, असे उत्तर धंगेकर यांनी दिले आहे.