- राज्य
- ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन
ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा
मुंबई: प्रतिनिधी
जुन्या पिढीतील विख्यात अभिनेत्री व नृत्यांगना संध्या शांताराम यांचे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्या ९७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर दादरच्या वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
मागील काही दिवसांपासून संध्या यांची प्रकृती ठीक नव्हती. काल रात्री त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचे पुत्र किरण शांताराम यांनी दिली आहे. आज सकाळी परळी येथील राजकमल स्टुडिओ मधून संध्या यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. संध्या या भारतीय चित्रपट सृष्टीतील विख्यात निर्माते दिग्दर्शक व्ही शांताराम यांच्या द्वितीय पत्नी होत्या.
मराठी चित्रपट सृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या पिंजरा या चित्रपटात त्यांनी केलेली भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहे. ‘दो आंखें बारह हाथ’, ‘झनक झनक पायल बाजे’ आणि ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ अशा हिंदी चित्रपटांमध्ये देखील संध्या यांनी उल्लेखनीय भूमिका केल्या. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण नृत्यशैलीसाठी त्या चित्रपटसृष्टीत आणि रसिक प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय होत्या.