कराडमध्ये सत्तासंघर्ष शिगेला : महायुती फिस्कटली, भाजपला स्वबळावर विश्वास, विरोधकांनी मोट बांधली!
कराड नगरपालिका निवडणूक २०२५
हैबत आडके, कराड
कराड शहराच्या राजकारणात सध्या प्रचंड उकळी फुटली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला मिळालेल्या ताकदीचा फायदा स्थानिक पातळीवर घेण्याच्या प्रयत्नात असतानाच विरोधकांनी नव्या समीकरणाची जोडाजोड केली आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे गट), यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही आघाडी यांनी हातमिळवणी करत भाजपसमोर कडवी लढत उभी केली आहे. काँग्रेसनेही स्वबळावर मैदान मारण्याची तयारी केली असून, नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवार दिला आहे. मात्र जिथे काँग्रेसचे उमेदवार नाहीत, त्या प्रभागांत समविचारी आघाडीला मदत करण्याचे संकेत दिल्याने अंतिम टप्प्यात लढत कराडची लढत तिरंगीच राहणार की दुरंगी होणार याकडे कराडकरांचे लक्ष लागले आहे.
अनेक वर्षानंतर कराड नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदाचे खुल्या आरक्षण लागू झाले आहे. त्यामुळे निवडणुकीत मोठी चुरस आहे. सुरुवातीला २२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते; त्यापैकी ११ अर्ज बाद ठरले. नगरसेवक पदासाठी आलेल्या ३३० पैकी ६८ अर्ज बाद झाल्याने आता नगराध्यक्षासाठी ११ तर नगरसेवकांसाठी २६२ उमेदवारांचे अर्ज शिल्लक आहेत. अर्ज माघारीची तारीख जवळ येत असल्याने सर्वच आघाड्यांची धावपळ सुरू असल्याचे दिसत आहे. अपक्ष उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी, बैठका आणि रात्री-अपरात्री चर्चा सुरू आहेत. मतविभागणी टाळणे हेच सगळ्यांचे लक्ष्य आहे.
महायुतीत मोठी तेढ...
राज्यात महायुतीची सत्ता असली तरी महायुतीच्या नेत्यांना कराडमध्ये मात्र भाजप-शिवसेना (शिंदे)-राष्ट्रवादी (अजित पवार) यांना एकत्र आणता आलेले नाही. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांनी केलेले प्रयत्न अपयशी ठरले आहेत. महायुतीसाठी आम्ही प्रयत्न केला होता मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, असा दावा महायुती मधील घटक पक्ष आणि त्यांचे नेतेमंडळी करताना दिसत आहेत. मात्र काहीही झालं तरी महायुतीची एकत्र मोट बांधली गेली नाही आणि तेढ वाढली, हीच वस्तुस्थिती आहे. त्यामुळे महायुती मधील घटक पक्षांनी व त्यांच्या स्थानिक आघाड्यांनी वेगवेगळी वाट चोखाळली आहे.
विरोधकांचे नवे समीकरण...
लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडी यांनी नगराध्यक्षपदासाठी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या नावावर एकमत केले आहे. जागावाटपाचाही तोडगा निघाल्याने ही संयुक्त आघाडी स्वबळावर लढणाऱ्या भाजप समोर मोठे आव्हान निर्माण करण्याची शक्यता आहे.
भाजपचे हिंदुत्व कार्ड...
भाजप जिल्हाध्यक्ष व कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक असणार आहे. त्यात ही विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच आणि पहिलीच होणारी कराड नगरपालिकेची निवडणूक आमदार डॉ. भोसले यांच्या नेतृत्वाची कसोटी ठरणार आहे. भाजपमध्ये काँग्रेस, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक मातब्बर कार्यकर्ते पक्षप्रवेश करून सहभागी झाले आहेत. मात्र भाजपने खुल्या गटातील या नगराध्यक्षपदाच्या जागेसाठी उमेदवारी देताना ज्येष्ठ नगरसेवक तथा प्रखर हिंदुत्ववादी नेते विनायक पावसकर यांना पसंती दिली आहे. गेल्या वेळी हिंदुत्वाच्या बळावर भाजपने नगरपालिका ताब्यात घेतली होती. यावेळीही तोच प्रयोग केला जाणार असेच चित्र दिसत आहे.
कराडचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा शिवजयंती उत्सव, हिंदू एकता मंचाच्या माध्यमातून पावसकर यांनी उभा केलेले संघटन आणि केंद्र-राज्यातील सत्तेचा निधीचा ओघ यामुळे या निवडणुकीत भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे.
राष्ट्रीय काँग्रेसचा स्वतंत्र डाव...
राष्ट्रीय काँग्रेसने हिंदू-मुस्लिम दोन्ही समाजात लोकप्रिय असलेला नव्या दमाचा चेहरा म्हणून अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण यांना थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. पक्षाने १५ प्रभागांत नगरसेवक पदासाठी उमेदवारही उभे केले आहेत. मात्र अनेक प्रभागांत नवखे चेहरे असल्याने पक्षाला कितपत यश मिळेल, याबाबत उत्सुकता आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपण कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत सक्रिय राहणार असल्याचे जाहीर केले असले तरी मोजक्या प्रचार सभांना आपण उपस्थित राहू, काँग्रेसचे उमेदवार जेथे पक्ष चिन्हावर उभे आहेत, तेथे आपण आवश्य प्रचारात उतरू , असे स्पष्ट केले आहे. मात्र जेथे काँग्रेसचा उमेदवार नसेल तेथे समविचारी आघाडीला किंवा उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यातूनही अर्ज माघारी घेण्यापर्यंत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणखी कोणती भूमिका घेणार, याची उत्सुकता आहे.
नगराध्यक्षपदाच्या प्रमुख उमेदवारांची सकारात्मक बाजू...
नगराध्यक्ष पदासाठी सध्या ११ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र अर्ज माघारी घेतल्यानंतर याबाबतचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र आजच्या स्थितीवरून प्रमुख तीन उमेदवारांमध्ये ही लढत रंगणार असल्याचे दिसत आहे. त्यांचे प्लस - मायनस पॉईंटचा आढावा खालील प्रमाणे सांगता येईल.
१. राजेंद्रसिंह यादव (लोकशाही + यशवंत आघाडी समर्थित) :
प्लस : पाच वेळा नगरसेवक, उपनगराध्यक्ष, विविध सभापती पदे, शहरात कॅडरबेस, अफाट जनसंपर्क, विकासकामांसाठी मोठा निधी आणण्याची सिद्ध कामगिरी.
मायनस : जुने चेहरा असल्याने नव्या पिढीला कमी आवाहन, काही प्रभागांत अंतर्गत नाराजी.
२. विनायक पावसकर (भाजप) :
प्लस : प्रखर हिंदुत्ववादी ओळख, हिंदू संघटनेची ताकद, अनेक टर्मचा अनुभव, केंद्र-राज्य सत्तेचा मोठा पाठिंबा, कराडचा शिवजयंती उत्सव यामुळे भावनिक कनेक्ट.
मायनस : फक्त हिंदुत्वावर अवलंबून राहिल्यास अल्पसंख्यांक आणि मधल्या मतदारांचा रोष.
३. झाकीर पठाण (राष्ट्रीय काँग्रेस) :
प्लस : दोन्ही समाजात स्वीकारार्ह चेहरा, चळवळीतून आलेला कार्यकर्ता, सामाजिक कामाची मोठी पार्श्वभूमी, मुस्लिम मतदारांची एकगठ्ठा साथ.
मायनस : बदलत्या स्थितीत पक्षाची शहरात मर्यादित संघटनात्मक ताकद, अनेक ठिकाणी नवखे उमेदवार, पहिल्यांदाच थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची संधी.
अर्ज माघारीपर्यंतच स्पष्ट होणार चित्र...
अर्ज माघारीच्या तारखेपर्यंत अपक्ष किती कमी होतात, काँग्रेस शेवटी एकला चलोची भूमिका घेते की समविचारी आघाडीत विलीन होते, भाजपला महायुतीचे बाकी घटक मदत करतात की नाही, यावरच कराड नगरपालिकेच्या निवडणुकीचे अंतिम रंग ठरणार आहेत.
000
