- राज्य
- पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग शेतकरी कृती समितीचा वडगाव मावळ तहसील कार्यालयावर मोर्चा
पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग शेतकरी कृती समितीचा वडगाव मावळ तहसील कार्यालयावर मोर्चा
शेतकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी लढा सुरूच राहील” — भाई भरत मोरे
वडगाव मावळ (दि. ९ ऑक्टोबर) — पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग शेतकरी कृती समितीच्या वतीने महामार्गामुळे बाधित शेतकऱ्यांच्या हक्कांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी वडगाव मावळ तहसील कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात आला.
हा मोर्चा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष भरत मोरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. लोणावळा ते देहूरोड परिसरातील १५ गावांमधील शेकडो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान मावळचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
✳️ प्रमुख मागण्या
बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा वाढीव मोबदला द्यावा.
शेतकऱ्यांच्या मुलांना आय.आर.बी. कंपनीत कायमस्वरूपी नोकऱ्या द्याव्यात.
शेतकऱ्यांना टोल फ्री मुंबई–पुणे पास मिळावा.
डंपिंगसाठी संपादित जमिनी शेतकऱ्यांना परत कराव्यात.
महामार्गापासून ३००–४०० फूट अंतरावरील संपादित जमिनी शेतकऱ्यांना परत द्याव्यात.
सेवा रस्ता तयार करावा.
टोलमधून वसूल झालेल्या रकमेतून संपादित गावांच्या विकासासाठी सीएसआर निधी वापरावा.
महामार्गालगत उभारलेल्या पेट्रोलपंप, मॉल, हॉटेल यांच्या शेजारी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी गाळा पद्धतीने दुकाने बांधावीत.
संपादित शेतकऱ्यांना शासनाचा प्रकल्पग्रस्त दाखला द्यावा.
मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा.
भरत मोरे म्हणाले, “जमीन व घरे खरेदी करता न आल्याने अनेक शेतकरी भूमिहीन झाले व देशोधडीला लागले आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही रस्त्यावर आणि न्यायालयीन लढा सुरू ठेवू.”
या मोर्चात कृती समितीचे अध्यक्ष गुलाब तिकोने, अनिल आंबेकर, विजय तिकोने, संतोष गिरी, बबनराव आंबेकर, कचरू पारखी, भाऊसाहेब पिंपळे, नंदकुमार पदमुले, जयसिंग ठाकूर, रोहिदास पारखी तसेच महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
About The Author
