- राज्य
- शनिशिंगणापूर देवस्थान कार्यालयाला ठोकले सील
शनिशिंगणापूर देवस्थान कार्यालयाला ठोकले सील
पोलीस बंदोबस्तात जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई
शनिशिंगणापूर: प्रतिनिधी
महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशात प्रसिद्ध असलेल्या शनिशिंगणापूर येथील शनी मंदिर देवस्थानाच्या कार्यालयाला जिल्हाधिकाऱ्यांनी सील ठोकले आहे. विश्वस्त मंडळ बरखास्त झाल्यानंतर कार्यालयातील कागदपत्रांमध्ये फेरफार होत असल्याची बाब उघडकीस आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. यापूर्वीचे विश्वस्त मंडळ आणि त्याच्या आधीचे विश्वस्त मंडळ हेच एकमेकांवर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांचे आरोप करीत आहेत. ऑनलाइन देणग्या आणि इतर अनेक मार्गांनी देवस्थानच्या कारभारात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले असून त्याची चौकशी सुरू आहे.
या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा प्रकार केला जाऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात, गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि जबाबदार नागरिक यांच्या उपस्थितीत देवस्थानच्या कार्यालयाला सील ठोकले. विश्वस्त मंडळ बरखास्त झाल्यापासून देवस्थानचा कारभार जिल्हा प्रशासनाकडे आला आहे.
विशेष म्हणजे शनिशिंगणापूरमध्ये चोरी होत नाही म्हणून या गावातील घरांना दरवाजे नाहीत. शनी ही न्यायाची देवता समजली जाते. त्याच शनि मंदिराची देखभाल करणाऱ्या विश्वस्त मंडळातील लोकांनी देवाच्या नावाने भ्रष्टाचार करण्याचे धाडस दाखवले आहे.