- राज्य
- संभाजीनगरच्या पत्त्यावर घायवळने मिळवले पारपत्र
संभाजीनगरच्या पत्त्यावर घायवळने मिळवले पारपत्र
पार्श्वभूमी न तपासता परवानगी देण्याच्या पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह
पुणे: प्रतिनिधी
पुण्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा व अन्य गंभीर गुन्हे दाखल असलेल्या निलेश घायवळ याने छत्रपती संभाजीनगर येथील बनावट पत्ता देऊन पारपत्र मिळवल्याची बाब पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. घायवळ्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी न तपासता छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी त्याला पारपत्र देण्यास परवानगी कशी दिली, याबाबत प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.
दुचाकी जाण्यासाठी जागा न दिल्याच्या शुल्लक कारणावरून गायवळ टोळीच्या गुंडांनी एका सर्वसामान्य नागरिकांवर गोळीबार करण्याचा प्रकार नुकताच घडला. त्याच दिवशी त्यांनी एका व्यक्तीवर केवळ दहशत निर्माण करण्यासाठी कोयत्याने वार देखील केले. या घटनेनंतर टोळीचा मोरक्या निलेश याच्यासह घायवळ टोळीवर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यावेळी निलेश घायवळ हा लंडनला पसार झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. परदेशात प्रवास करण्यासाठी निलेश घायवळ याला पार पत्र कसे उपलब्ध झाले, याची चौकशी केली असता त्याने छत्रपती संभाजी नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गौरी घुमटानंदी बाजार, कोतवाली, माळीवाडा रस्ता हा पत्ता दिला. कोतवाली पोलिसांनी घायवळ याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची चौकशी न करता त्याच्या पारपत्रासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले, ही बाब उघडकीला आली आहे.
गुन्हेगारीतून मिळवलेल्या अफाट संपत्तीमधून निलेश घायवळ याने लंडन येथे घर खरेदी केले आहे. त्याचा मुलगा तिथेच शिक्षण घेत आहे. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी निलेश घायवळ हा देखील तिकडे पसार झाला आहे. त्याच्या विरोधात पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केली आहे.