- राज्य
- 'मी त्या गोष्टीत देणार नाही लक्ष...'
'मी त्या गोष्टीत देणार नाही लक्ष...'
अपघात प्रकरणी गौतमी पाटील यांनी सोडले मौन
पुणे: प्रतिनिधी
अखेर प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांनी आपल्या कारच्या अपघात प्रकरणी मौन सोडून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अपघात झालेली गाडी माझी होती पण मी त्यावेळी गाडीत नव्हते. मी ज्याच्यात नाही त्या गोष्टीत मी लक्ष देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
इंदापूर येथे गौतमी यांचा कार्यक्रम पार पडल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींकडे अपघात प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली. या प्रकरणात माझ्यावर मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. मात्र, या अपघाताच्या वेळी मी त्या गाडीत नव्हते हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले आहे. पोलिसांनीही ते स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्या अपघाताशी माझा काही संबंध नाही, असे त्या म्हणाल्या.
या अपघातानंतर ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कठोर कारवाईची सूचना केली. त्याबाबत बोलताना गौतमी पाटील म्हणाल्या की, दादांना त्यावेळी जे वाटले तसे ते बोलले. मी तिथे नव्हते एवढेच माझे म्हणणे आहे.
तीस सप्टेंबरला रात्री पाटील यांच्या गाडीने वडगाव पुलावर उभ्या असलेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यात रिक्षाचालक सामाजी मरगळे गंभीर जखमी झाले आहेत. गौतमी पाटील यांनी त्यांची विचारपूस करून उपचारासाठी मदत करायला हवी होती, अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटली. तसे न केल्याबद्दल आंदोलन देखील झाले. मरगळे कुटुंबीयांनी गौतमी पाटील यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही दिला आहे.