वांगचुक यांच्या अटकेच्या विरोधात लडाखी विद्यार्थी रस्त्यावर
पुण्यातून निघाला मोठा मोर्चा
पुणे: प्रतिनिधी
लद्दाख येथील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या अटकेच्या निषेधार्थ येथे शिकणाऱ्या लडाखी विद्यार्थ्यांनी जंगली महाराज रस्त्यावरून मोठा मोर्चा काढला.
वांगचुक यांना केलेली अटक लोकशाही विरोधी आणि अन्यायकारक असल्याचा आरोप करून त्यांची तातडीने सुटका करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.
वांगचुक हे त्यांची गांधीवादी विचारसरणी आणि शाश्वत विकासाच्या भूमिकेसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांचा विकासाला नव्हे तर विनाशकारी विकास प्रकल्पांना विरोध आहे, असा दावा आंदोलक विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. वांगचुक यांना करण्यात आलेली अटक त्यांची प्रतिमा मलिन करणारी आणि सरकारच्या विरोधातील आवाज जबरदस्तीने दाबणारी आहे, असा आक्षेपही विद्यार्थ्यांनी घेतला.
लडाख मध्ये तब्बल 95 आदिवासी जमाती राहतात. पशुपालन, शेती आणि पर्यटन हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. केवळ तीन लाख लोकसंख्या असलेल्या लद्दाखचे क्षेत्र ५९,१४६ चौरस किलोमीटर एवढे आहे. या भागातील जमिनीचा वापर स्थानिक ग्रामसभा आणि स्वायत्त हिल डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्याकडून निश्चित केला जातो.
कलम 370 रद्द करताना लद्दाखला केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्यात आले. त्यावेळी सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने लद्दाखला सहाव्या सूची अंतर्गत स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. स्थानिक संस्कृती, परंपरा आणि स्वायत्तता टिकवून ठेवण्यासाठी ते आवश्यक आहे. मात्र, या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून कोणतेही पावले उचलण्यात आली नाही, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
सोनम वांगचुक यांनी आमच्यासाठी खूप मोठे कार्य केले आहे. त्यांनी शिक्षणाचा प्रभावी प्रसार केला. कृत्रिम डोळे विकसित केले. लदाखच्या पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी अनेक पावले उचलली. आमचे लोक त्यांच्या हक्कांसाठी पाच वर्षापासून संघर्ष करीत आहेत. लद्दाख मध्ये झालेल्या हिंसाचाराला सोनम वांगचुक हे जबाबदार नाहीत, असा दावा विद्यार्थ्यांनी केला.