- राज्य
- भारत पाकिस्तान सामना दाखवण्याचा पीव्हीआरचा निर्णय रद्द
भारत पाकिस्तान सामना दाखवण्याचा पीव्हीआरचा निर्णय रद्द
शिवसेना ठाकरे गटाच्या इशाऱ्यानंतर घेतली माघार
मुंबई: प्रतिनिधी
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना देशभरात पीव्हीआर सिनेमाच्या स्क्रीनवर दाखवण्याचा निर्णय शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दिलेल्या इशाऱ्यानंतर पीव्हीआर सिनेमाने मागे घेतला आहे. कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष थॉमस डिसूजा यांनी ही माहिती दिल्याचे शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांनी माध्यमांना सांगितले.
पीव्हीआर सिनेमाच्या माध्यमातून देशभरातील तब्बल 100 स्क्रीनवर भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार होते. शनिवारी त्याबाबत पीव्हीआरने घोषणा केली होती. मात्र, शिवसेना ठाकरे गटाने पीव्हीआरच्या या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना खेळणे, खेळवणे, दाखवणे आणि बघणे हा पहलगाम येथे महिलांच्या पुसल्या गेलेल्या सिंदूरचा अपमान आहे. देशद्रोह आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाने केली आहे.
त्यासंबंधी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट प्रसिद्ध केली आहे. क्रिकेट आणि दहशतवाद एकत्र चालणार नाही. पीव्हीआर सिनेमा तुमच्याकडे हिंदुत्ववादी जनतेचे लक्ष आहे, असा इशारा राऊत यांनी या पोस्टमध्ये दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधानंतर पीव्हीआरने महाराष्ट्रात भारत पाकिस्तान सामन्याचे थेट प्रक्षेपण न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.