भोर तालुक्यात सर्रासपणे लचकेतोड सुरूच...
महसूल अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कोट्यवधीचे नुकसान... तर वन विभागाची देखिल डोळेझाक... स्थानिकात प्रशासनाच्या कारभारावर नाराजी...
भोर, रुपेश जाधव
भोर तालुका हा सह्याद्रीच्या डोंगर रांगानी व्यापलेला असून घनदाट झाडी असल्यामुळे नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. त्यामुळे धन दांडग्यांच्या नजरा भोर तालुक्याच्या सौंदर्यावर पडल्या असुन काही धनिकांनी डोंगरच्या डोंगरच विकत घेतले आहेत. महसूल व वनखात्याच्या अधिकाऱ्यांच्या 'अर्थ'पूर्ण दुर्लक्षामुळे डोंगरटेकड्याची सर्रास लचकेतोड सुरु असून त्यामुळे घनदाट झाडी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
भोर तालुक्यातील नीरा देवघर धरण परीसर, भाटघर धरण परीसर, महामार्ग परिसरात धन दांडग्या लोकांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने विकत घेतल्या असून धनिकांकडून डोंगर, टेकड्या फोडून फार्महाऊस उभारले आहेत. पसुरे वेळवंड खोरे, हिरडस मावळ खोरे परीसरात मोठ्या प्रमाणावर टेकड्या पोखरून नदीकाठी, धरणकाठी, फार्महाऊस बांधले आहेत. व त्यापरिसरतील वृक्षतोड मोठ्या प्रमाणात केली गेली आहे. तर महामार्ग परिसरात सर्रास डोंगर, टेकड्या पोखरुन व्यावसायिक शेड, हॉटेल, उभारण्याचा घाट सुरु आहे. त्यासाठी त्या जागेवर असलेले वृक्ष तोड होत असुन सर्व सामान्य जनतेच्या उघड्या डोळ्यांना दिसत असलेली वृक्ष तोड मात्र हाकेच्या अंतरावर असलेल्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्याच निदर्शनास का येत नाही अशा आशयाची जनसामान्य जनतेत चर्चा रंगत आहे.
विना परवाना उत्खननाचा व वृक्षतोड धंदा भोर तालुका आणि परीसरात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आशिर्वादाने जोरात सुरू आहे. सदर प्रकार रात्रीच्या वेळी किंव्हा आठवडी सुट्टीच्या दिवशी जोमात सुरू असतो तरी याकडे मात्र अधिकारी, कर्मचारी जाणीव- पूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिक नागरिकात बोलले जात आहे.
सध्या महामार्ग परिसरात डोंगरटेकड्या फोडण्याचे काम जोमात सुरू आहे.पुढील दर्शनी भागात शेड व मागील बाजूस टेकडी उत्खनन सुरु असून ते महामार्गा वरून ये जा करणाऱ्या सर्व सामान्य जनतेला उघड्या डोळ्यांनी दिसत असताना सदर सजातील अधिकारी व कर्मचारी यांच्या निदर्शनास का येत नाही की ज्यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. मात्र याकडे अधिकारी व कर्मचारी यांचे जाणीवपूर्वक अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याची चर्चा स्थानिक नागरिकात रंगत आहे.
उत्खनन व वृक्षतोड करणाऱ्यांची परीसरात दबदबा असण्याने सर्व सामान्य नागरीक त्यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी धाजवत नाही कारण बहुतेकांचे राजकीय पुढाऱ्यांनशी बसने उठणे असल्याचे बोलले जात असून लोकप्रतीनिधींनीही याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे स्थानिक नागरिकात बोलले जात आहे.
भोर वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
"विकासाच्या नावाखाली सुरू असलेली बेसुमार वृक्षतोड डोंगराच्या टोकड्यांची होत असलेली लचकेतोड यावर वेळीच निर्बंध घालण्याची गरज आहे. कारण यामुळे भुत्खलन होऊन माळीनसारख्या दुर्घटना घडण्यास वेळ लागणार नाही". सागर यादव, अध्यक्ष भोर तालुका, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष
"बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांवर अनेक ठिकाणी कारवाई केली आहे.आगामी काळातही विना परवाना खोदकाम करताना आढळल्यास त्यांच्यावर त्वरित कारवाई केली जाईल." राजेंद्र नजन, तहसीलदार भोर तालुका.
000
About The Author
