- राज्य
- महेश मांजरेकर यांच्या प्रथम पत्नीचे निधन
महेश मांजरेकर यांच्या प्रथम पत्नीचे निधन
चित्रपटसृष्टीवर पसरली शोककळा
मुंबई: प्रतिनिधी
विख्यात अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांच्या प्रथम पत्नी आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध वेशभूषाकार दीपा मेहता यांचे 25 सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांचा मुलगा सत्या याने समाज माध्यमाद्वारे याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या निधनाचे कारण अद्याप समजले नसून त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
ती माझ्यासाठी एखाद्या आई पेक्षाही जास्त काही होती. तिचे धैर्य आणि शक्ती कायमच इतरांसाठी प्रेरणादायक ठरली आहे, अशा भावना व्यक्त करून सत्याने दीपा मेहता यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
दीपा मेहता आणि महेश मांजरेकर यांची महाविद्यालयापासून मैत्री होती. त्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा सण 1987 मध्ये विवाह झाला. त्यांना सत्य आणि अश्वमी अशी दोन अपत्य आहेत. मात्र, काही वर्षातच ते विभक्त झाले. त्यानंतर मांजरेकर यांनी मेधा यांच्याशी विवाह केला. त्यांना सई ही मुलगी आहे.
दीपा मेहता या विख्यात वेशभूषाकार होत्या. त्यांचा क्वीन ऑफ हार्ट हा स्वतःचा साड्यांचा ब्रँड आहे. या ब्रँडसाठी त्यांची कन्या अश्वमी यांनी मॉडेलिंग केले आहे. आपला व्यवसाय, कुटुंब आणि मित्रमंडळी यांच्यात रमलेल्या दीपा यांच्या निधनामुळे सर्वांना धक्का बसला आहे.