- राज्य
- नाफेड संचालक मंडळात बनावट कागदपत्रांच्या आधारे घुसखोरी
नाफेड संचालक मंडळात बनावट कागदपत्रांच्या आधारे घुसखोरी
सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने प्रकरणाला तोंड फोडण्याची आग्रही मागणी
नाशिक: प्रतिनिधी
देशातील सर्वात मोठ्या कृषी सहकारी संस्थेच्या (नाफेड) महाराष्ट्र संचालक निवडणुकीत एका उमेदवाराने कथित बोगस कागदपत्रांवरून उमेदवारी दाखल करून निवडून आल्याचा आरोप होत आहे. यामुळे देशभरातील सुमारे ८०० सभासदांची फसवणूक झाल्याची भावना व्यक्त होत असून २६ सप्टेंबरला भारत मंडपम येथे होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबद्दल सोक्षमोक्ष लावला जाणार का याची देशभरातील सहकार क्षेत्रामध्ये चर्चा आहे.
नाशिकच्या वडाळीभोई येथील इंदुमती बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्थेने दिलेल्या ठरावावरून भाजप समर्थक उमेदवार केदा तानाजी आहेर यांचे सभासदत्वच संशयास्पद असल्याचे निबंधक कार्यालयाकडून स्पष्ट झाले आहे. केदा आहेर हे नाफेड साठी अर्ज दाखल करण्यात आला त्यावेळी इंदुमती बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्थेचे केवळ संचालक नव्हे तर सर्वसामान्य सभासद देखील नव्हते. त्यामुळे निवडणूक अधिकारी आणि नाफेड प्रशासनाने छाननी न करता आहेर यांची उमेदवारी मान्य केली आहे काय, यासह नाफेडच्या एकूण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणामुळे नाफेड प्रशासन, संचालक मंडळ आणि निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या सनदी अधिकाऱ्याची फसवणूक झाली असल्याची शक्यता असून त्याची अंतर्गत चौकशी केंद्रीय सहकार निबंधक व निवडणूक विभागाकडे सुरू असल्याची माहिती उपलब्ध होत आहे. या आरोपात तथ्य आढळल्यास पश्चिम भारतातील मतदारसंघ क्रमांक ४ मध्ये फेरनिवडणूक घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सर्वसाधारण सभेत या विषयाला तोंड फोडले जाणार का, याची चर्चा सहकार विभागात होत आहे.