- राज्य
- वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा
वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला नवीन अंदाज
पुणे: प्रतिनिधी
परतीच्या वाटेवर असलेला मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रातून पुढे सरकण्याचे नाव घेत नाही. भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या नव्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागात वादळी तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच राहणार आहे.
उत्तर व मध्य महाराष्ट्र, नाशिक व पुणे घाटमाथा या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल. त्याच वेळ ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहिल्यामुळे या पावसाला वादळी स्वरूप असेल, अशी शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे.
मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या किनारपट्टीच्या भागात हवामानशास्त्र विभागाने ऑरेंज अलर्ट अर्थात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट अर्थात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यत व्यक्त केली आहे.
सर्वसाधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीला मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होऊन ऑक्टोबरच्या सुरुवातीला पाऊस महाराष्ट्रातून पुढे सरकलेला असतो. यावर्षी मात्र मे महिन्यापासून आत्तापर्यंत पावसाने राज्यात ठाण मांडले आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सूनच्या परतीला सुरुवात होऊन आठवड्याच्या अखेरपर्यंत पाऊस परतलेला असेल. मात्र, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातही काही प्रमाणात पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.