- देश-विदेश
- आंतरराष्ट्रीय सोने तस्करी रॅकेटचा पर्दाफाश
आंतरराष्ट्रीय सोने तस्करी रॅकेटचा पर्दाफाश
‘ऑपरेशन गोल्डन स्वीप’अंतर्गत मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई
मुंबई : प्रतिनिधी
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय सोने तस्करीच्या एका मोठ्या रॅकेटचा डीआरआयने (Directorate of Revenue Intelligence) पर्दाफाश केला आहे. ‘ऑपरेशन गोल्डन स्वीप’ या गुप्त मोहिमेद्वारे करण्यात आलेल्या या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
डीआरआयने या कारवाईदरम्यान १०.५ किलो परदेशी मूळाचे सोने जप्त केले असून त्याची किंमत तब्बल १२.५८ कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणात १३ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात २ बांगलादेशी, ६ श्रीलंकन नागरिक, २ एअरपोर्ट कर्मचारी, २ हँडलर आणि १ मास्टरमाईंड यांचा समावेश आहे. ही टोळी मुंबई ते दुबईपर्यंत पसरलेली असून गेल्या अनेक महिन्यांपासून ही तस्करी सुरु असल्याचे समोर आले आहे.
तपासात असे उघड झाले की ही टोळी अत्यंत गुप्त आणि चलाख पद्धतीने काम करत होती. दुबई, सिंगापूर, बँकॉक आणि ढाका येथून येणाऱ्या ट्रान्झिट प्रवाशांचा वापर कॅरिअर म्हणून केला जात होता. हे प्रवासी मेणापासून तयार केलेल्या अंडाकृती कॅप्सुलमध्ये सोने लपवून आपल्या शरीरात घेऊन येत असत. मुंबई विमानतळावर आल्यानंतर हे प्रवासी एअरपोर्टमधील सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे सोने सुपूर्द करत असत.
तपासादरम्यान असेही निष्पन्न झाले की एअरपोर्टवरील ‘मीट अँड ग्रीट’ सेवा कर्मचाऱ्यांचा या तस्करीत मोठा सहभाग होता. त्यांचे काम प्रवाशांकडून सोने घेऊन ते विमानतळाबाहेर पोहचविणे हे होते. पुढे हे सोने हँडलर आणि रिसिव्हरमार्फत मास्टरमाईंडपर्यंत पोहोचवले जात होते.
या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे सोने अवैधरित्या भारतात आणले जात होते. डीआरआयच्या मुंबई झोनल युनिटने ही गुप्त कारवाई पार पाडून या रॅकेटचा भंडाफोड केला. या तस्करीत ‘इनसाइडर थ्रेट’ म्हणजेच आतील कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याने देशाच्या सुरक्षेलाच मोठा धोका निर्माण झाला होता.
सध्या डीआरआय या नेटवर्कचा मनी ट्रेल आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचा तपास करत आहे. या प्रकरणात आणखी काही मोठे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

