- देश-विदेश
- राहुल गांधी यांच्या विरोधातील खटल्यात महत्त्वाचा अर्ज फेटाळला
राहुल गांधी यांच्या विरोधातील खटल्यात महत्त्वाचा अर्ज फेटाळला
ॲड. मिलिंद पवार यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दिला निर्णय
पुणे: प्रतिनिधी
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल लंडनमधील भाषणात केलेल्या कथित बदनामी प्रकरणात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या मानहानीच्या खटल्यात याचिकाकर्ते सात्यकी सावरकर यांचा महत्त्वाचा अर्ज पुण्यातील विशेष एमपी–एमएलए न्यायालयाने फेटाळला आहे.
या खटल्यात तक्रारदार सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या अर्जात राहुल गांधींचे लंडनमधील भाषणाचे युट्यूबवरील व्हिडिओ हटवू नये, तसेच विश्रामबाग पोलीस ठाण्याने युट्यूब कंपनीमार्फत केलेला तांत्रिक तपास अहवाल न्यायालयाने मागवावा, अशी मागणी केली होती.
राहुल गांधी यांचे वकील अॅड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी या अर्जाला तीव्र विरोध दर्शवला. सध्या पुराव्यांची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असून या टप्प्यावर न्यायालयाला पोलिसांचा तपास अहवाल मागवण्याचा अधिकार नाही, असे त्यांनी न्यायालयात सांगितले. तसेच हा फौजदारी खटला असल्याने न्यायालयाला युट्यूबवरील व्हिडिओ हटवू नये, असा बंदी आदेश देण्याचा अधिकार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
विशेष न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांनी अॅड. मिलिंद पवार यांचा युक्तिवाद मान्य करून तक्रारदार सात्यकी सावरकर यांचा अर्ज फेटाळला. या खटल्यात अॅड. अजिंक्य भालगरे, अॅड. सुयोग गायकवाड आणि अॅड. हर्षवर्धन पवार यांनी सहकार्य केले.
या खटल्याची पुढील सुनावणी ३ ऑक्टोबर २०२५ रोजी होणार आहे.